घरफोडी करून २ लाख ७७ हजार रुपयांच्या दागिन्यांची चोरी

गौतम बचुटे/केज:- केज तालुक्यातील युसुफवडगाव येथे एकाच रात्री सात जणांची घरे फोडून चोरट्यांनी २ लाख ७७ हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली आहे.

युसुफवडगाव येथील ओम बाबुराव खरबड हे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सेवक म्हणून कार्यरत आहेत. दि. १५ नोव्हेंबर रोजी ते रात्रपाळीवर कामाला गेले होते. त्या रात्री चोरट्यांनी ओम खरबड, लक्ष्मी बापू वैरागे, महादेव गणपती बोरगे, संदीप भगवान जोशी, जयपाल बाबुराव सूर्यवंशी, महादेव संभाजी इंगळे आणि वनमाला सोंदने या सात जणांच्या घराचे कुलूप तोडून घरफोडी केली.

ओम खरबड यांच्या घरातील लोखंडी पेटीचे कुलूप तोडून ५ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, ५ ग्रॅम वजनाचे झुंबर, गंठण, चांदीचे कडे आणि रोख ३,५०० रुपये चोरले. तर लक्ष्मी वैरागे यांच्या घरातून सोन्याचे मणी, डोरले, गुंड, चांदीचे कडे आणि १ लाख २० हजार रुपये रोख, महादेव बोरगे यांच्या घरातून ९ ग्रॅम वजनाची सोन्याची बोरमाळ आणि रोख १२ हजार रुपये, तर वनमाला सोंदने यांच्या घरातून ६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मणी चोरीला गेले. तसेच संदीप जोशी, जयपाल सूर्यवंशी आणि महादेव इंगळे यांच्या घरीही घरफोडी झाली आहे.

ओम खरबड यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध युसुफवडगाव पोलीस ठाण्यात गु.र.नं. ३४०/२०२६, भा.न्या.सं. ३०५, ३३१ (४) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप मांजरमे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल सीताराम डोंगरे हे तपास करीत आहेत.

Pratik Tarkase is the Founder & Editor-in-Chief of Beed News Express. A recipient of the prestigious Baba Dalvi Memorial Award, honored by Hon. Chief Minister Devendra Fadnavis for his outstanding...