गौतम बचुटे/केज : डिघोळअंबा (ता. अंबाजोगाई) शिवारात सापडलेल्या अज्ञात इसमाच्या खून प्रकरणी पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी आज घटनास्थळी भेट देऊन तपासाचा आढावा घेतला. 25 नोव्हेंबर रोजी तलावाजवळ 50 ते 55 वर्षीय इसमाचा मृतदेह आढळला होता. डोक्यात दगड घालून खून करून मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न झाला होता. ओळख न पटल्याने मृतदेह अंबाजोगाईच्या शवागृहात ठेवण्यात आला आहे.

हा खून केवळ मारहाणीतून झालेला नाही, तर पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेह जाळण्याचा प्रयत्न झाल्याने हे प्रकरण अधिक गंभीर झाले आहे. ओळख पटत नसल्याने तपासाला गती मिळत नाही, कारण मृत व्यक्ती कोण, कुठला, कोणाशी वाद होता, याचाच शोध अजून लागलेला नाही. त्यामुळे पोलीस अधीक्षकांनी स्वतः घटनास्थळी येऊन तपासाला दिशा दिली आहे. ग्रामीण भागात अशा पद्धतीने बेवारस मृतदेह सापडणे आणि ओळख न पटणे, ही पोलिसांसमोरची मोठी अडचण आहे. जोपर्यंत ओळख पटत नाही, तोपर्यंत आरोपीपर्यंत पोहोचणं कठीण आहे.

एसपींनी केली घटनास्थळाची पाहणी

पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, सहाय्यक पोलीस अधीक्षक वेंकटराम आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बंटेवाड यांनी घटनास्थळी जाऊन युसुफवडगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप मांजरमे यांना तपासाबाबत मार्गदर्शन केले. परिसरातील सीसीटीव्ही, बेपत्ता व्यक्तींच्या तक्रारी आणि गावातून मिळणारी माहिती यातून ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरू आहे.

मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी आवाहन

खून झालेल्या व्यक्तीच्या अंगात पांढऱ्या रंगाचा फाटलेला व अर्धवट जळालेला सदरा, करड्या रंगाची चड्डी, त्यावर काळ्या व पिवळ्या रंगाचे पट्टे आणि लाल रंगाच्या कपड्याचे ठिगळ आहे. कमरेला लाल रंगाचा करदोडा असून त्यास काळ्या, पांढऱ्या व पोपटी रंगाच्या तीन चाव्या बांधलेल्या आहेत. मृतदेहाजवळ काळ्या रंगाच्या चमड्याच्या जोड्याची जोडी, लाल चौकडी रंगाचा रुमाल, त्यामध्ये डेटॉल व मेडिमिक्स साबण आढळून आला आहे. या वर्णनाच्या व्यक्तीसंदर्भात माहिती असल्यास युसुफवडगाव पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप मांजरमे यांनी केले आहे.

ही बातमी ही वाचा…

Pratik Tarkase is the Founder & Editor-in-Chief of Beed News Express. A recipient of the prestigious Baba Dalvi Memorial Award, honored by Hon. Chief Minister Devendra Fadnavis for his outstanding...